मनरेगातून औसा पॅटर्नची निर्मिती

मनरेगातून औसा पॅटर्नची निर्मिती

अश्‍विनी घोटाळे-बोरगांवकर महाराष्ट्र वार्षिकी 2023 (वर्ष 14 वे)

आ. अभिमन्यू पवार हे शेती आणि शेतकर्‍यासंदर्भात मानतात की, शेती हे जर शेतकर्‍यांचे हृदय असेल तर शेतररस्ते या रक्तवाहिन्या आहेत. बर्‍याच ठिकाणी या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या असल्यामुळे शेतकर्‍यांची तब्येत बिघडली आहे. शेतकर्‍यांचे हे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी कुठे एंजिओप्लास्टी करावी लागणार आहे तर कुठे बायपास सर्जरी करावी लागणार आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर एकापेक्षा अनेक योजनांमधून निधी उपलब्ध करून शेतरस्ते तयार करायचे व भविष्यात अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी घ्यायची, हा आहे शेतकर्‍यांचा औसा पॅटर्न.

मनरेगा व रोहयोतून ग्रामविकासाचा व शेतकरी हिताचा ‘औसा पॅटर्न’ आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकार होत आहे. मनरेगातून शेतरस्तेव ग्रामसमृद्धीच्या विविध कामांच्या औसा पॅटर्नची राज्यातील ग्रामीण भागात चर्चा आहे. आ. पवार हे भाजपचे आमदार. औसा पॅटर्न अंतर्गत कामाचे पहिले दोन टप्पे हे भाजप विरोधी पक्षात असताना म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले. सत्ता हाती नसतानाही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण आणि इच्छाशक्तीच्या बळावर आ. अभिमन्यू पवार यांनी औसा पॅटर्नची निर्मिती केली आणि त्याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने औसा पॅटर्न राज्यात ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजने’च्या आणि ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेतरस्ते योजने’अंतर्गत राबविण्याचा निर्णय घेतला.

शेत तिथे रस्ता 

मनरेगाच्या औसा पॅटर्नची सध्या जिल्ह्यात व राज्यात चर्चा आहे. औसा हा लातूर जिल्ह्यातील तालुका असून पूर्वी म्हणजे 30 सप्टेंबर 1993 रोजीच्या भूकंपाने औसा तालुका (आणि विशेषतः भूकंपाचा केंद्रबिंदू असलेला किल्लारी परिसर) जगासमोर आला होता. तसेच मागास तालुका, शेतकरी आत्महत्या, सहकाराची पडझड इत्यादींसाठी देखील हा तालुका ओळखला जातो. शिवाय बहामनी राजवटीतील भुईकोट किल्ला, खरोसा लेणी आणि मल्लनाथ महाराज मठ इत्यादी पर्यटन स्थळांमुळेदेखील हा तालुका प्रसिद्ध आहे. ‘शिक्षणाचा लातूर पॅटर्न’ राज्यात प्रसिद्ध आहेच. पण उद्योगांचा अभाव असलेल्या आणि शेतीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात नवीन नेतृत्वाने शेतीविकासाचा नवीन पॅटर्न जन्मास घातला आहे. त्यात प्रामुख्याने शेतरस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत आणि बरीच कामे प्रगतिपथावर आहेत. आ. अभिमन्यू पवार हे शेती आणि शेतकर्‍यासंदर्भात मानतात की, शेती हे जर शेतकर्‍यांचे हृदय असेल तर शेतररस्ते या रक्तवाहिन्या आहेत. बर्‍याच ठिकाणी या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या असल्यामुळे शेतकर्‍यांची तब्येत बिघडली आहे. शेतकर्‍यांचे हे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी कुठे एंजिओप्लास्टी करावी लागणार आहे तर कुठे बायपास सर्जरी करावी लागणार आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर एकापेक्षा अनेक योजनांमधून निधी उपलब्ध करून शेतरस्ते तयार करायचे व भविष्यात अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी घ्यायची, हा आहे शेतकर्‍यांचा औसा पॅटर्न.

या पॅटर्नचा जन्म कसा झाला हे पाहू. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कालखंड होता. औसा विधानसभा मतदारसंघातील गावांना भाजप उमेदवार अभिमन्यू पवार भेटी देत होते. तेव्हा काही गरीब शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या बनीम कोणीतरी जाळलेल्या घटना त्यांच्या कानावर घातल्या. पुढे ऑक्टोबर 2020 मधील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बनमी वाहून गेलेल्या असंख्य शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आ. पवार यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बहुतांश गावातील बहुतांश शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही. सोयाबीन, हरभरा, ज्वारी इत्यादीच्या राशी एकत्रित का होत आहेत, शेतकरी जोडधंदा का सुरू करू शकत नाहीत याचे कारण शेतरस्ता नसल्याने वाहनच शेतात येणार नाही हे सांगण्यात येत असे. बहुसंख्य शेतकर्‍यांच्या आजच्या दुरावस्थेचे एक प्रमुख कारण म्हणजे शेतरस्त्याचा अभाव, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून निवडून आल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी शेतकर्‍यांचे दुःख दूर करण्यासाठी गावात ‘शेत तिथे रस्ता’ तयार करण्याचा निर्धार केला. 

या मोहिमेस सुरुवात करण्यापूर्वी त्यातील अडचणी आ. पवार यांनी आधी सोडविल्या. तीन घटक या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात याची कल्पना त्यांना होती. 1. जनजागृती, 2. पक्षीय मतभेद बाजूला सारून स्थानिक गाव नेतृत्वाला एकत्रित आणणे आणि 3. प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास देणे हे तीन घटक होते. शेतकर्‍यांना शेतरस्त्याचे महत्त्व माहीत असले तरी पण पिढ्यान्पिढ्यांच्या वादांमुळे अनेक शेतरस्ते अतिक्रमणाने ग्रासले आहेत आणि शेतरस्ते अभियान पूर्णत्वास नेण्यासाठी गावपुढार्‍यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. कारण त्यासंदर्भातील प्रस्ताव हे ग्रामपंचायतीकडून यावे लागतात. शेतकर्‍यांना आणि गावातील स्थानिक अभिजनांना विश्‍वासात घेण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी गावोगावी असंख्य सभा आणि काही कार्यशाळा घेतल्या. त्यातून स्थानिक लोकप्रतिनिधी ते स्थानिक प्रशासनासमोर मनरेगातून ग्रामविकास ही संकल्पना मांडली. शिवाय प्रसंगी कायद्याने दिलेले अधिकार वापरा असा संदेशही दिला. जमीन महसूल कायदा 1966, कलम 143 नुसार तहसीलदार शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा शेतरस्ता उपलब्ध करून देतात तर मामलेदार कोर्ट अ‍ॅक्ट 1906, कलम 5 नुसार तहसीलदार शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे काढून शेतरस्ता मोकळा करून देतात इ. यासंदर्भात कायदेशीर तरतुदी आहेत.



दोन टप्प्यांतील या कामाचे लोकार्पण तत्कालीन विरोधी पक्षनेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 4 जून 2023 रोजी करण्यात आले. 21 फेब्रुवारी 2021 ते 30 जून 2022 या दोन टप्प्यातील कालखंडात 933 कि. मी. लांबीचे शेतरस्ते अतिक्रमणयुक्त झाले, त्याचे मातीकाम व दबई काम पूर्ण झाले. 300 कि.मी. लांबीच्या शेतरस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. या अभियानामुळे अनेक गावांच्या एकमेकांशी जोडणार्‍या शिवरस्त्यांचे काम झाले. शेतरस्त्यांचा हा औसा पॅटर्न शासनाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने’अंतर्गत स्वीकारला आहे. (शासननिर्णय - 13 नोव्हेंबर 2021)

मनरेगातून ग्रामसमृद्धी

शेतरस्त्याच्या कामाबरोबरच मुक्या जनावरांच्या गोठ्याचे आणि फळबाग लागवडीचे मोठे कार्यही सुरू आहे. शेत तिथे रस्ता अभियान आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी देताना आ. अभिमन्यू पवार यांच्या लक्षात आले की ऊन, पाऊस थंडीत शेतकर्‍यांची जनावरे उघड्यावर असतात. सर्पदंश होऊन, वीज पडून जनावरे दगावतात. त्यामागे गोठा नसणे हे एक प्रमुख कारण होते. फळबाग, सेंद्रिय शेती, जोडधंदा करावा इत्यादी सल्ले आपण शेतकर्‍यांना देतो. बागायती शेती करणे शक्य असूनही शेतकरी पारंपरिक पिकांमध्ये अडकून पडतो. शेतकर्‍यांना सल्ल्याची आवश्यकता नसते कारण तो स्वतःच अनुभवातून शेतीतज्ज्ञ असतो पण त्याला आवश्यकता असते ती त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची. हे सर्व लक्षात घेऊन आ. अभिमन्यू पवार यांनी शेततळे, सिंचन विहीर, जनवरांसाठी गोठा, फळबाग लागवड, सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प इत्यादीचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियान हाती घेतले. त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गाव-वाडी-वस्तीस भेट देऊन आ. पवार यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. या अभियानाची भूमिका शेतकर्‍यांपुढे मांडली. पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यात वेळ गेला असला तरी शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने 1090 गोठ्यांची प्रत्यक्षात निर्मिती केली तर 1200 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात फळबाग लागवड केली. यातून असंख्य मुक्या जनावरांना आसरा मिळाला. असंख्य जिरायती शेतकरी बागायती झाले आहेत.

शेतकर्‍यांनी, ग्रामपंचायतीने शेतरस्त्यांचे प्रस्ताव सादर करायचे. प्रशासनाने सर्वेक्षण करून अतिक्रमण केले असेल तर रस्ते मोकळे करून द्यायचे. मग माझ्या आमदार निधीतून शेतरस्त्यांचे प्रारंभिक मातीकाम आणि दबाईकाम करायचे. मनरेगांंतर्गत किंवा पालकमंत्री शेत व पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण करायचे. या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावायची. या पॅटर्ननुसार पुढील 2 वर्षांत मतदारसंघातील जवळपास 2500 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद/शिव रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. मतदारसंघातील शेवटचा शेतरस्ता पूर्ण होईपर्यंत माझा संपूर्ण आमदार निधी हा शेतकर्‍यांना समर्पित आहे.  - आ. अभिमन्यू पवार, औसा, विधानसभा मतदारसंघ

मातीकाम झालेले 933 कि.मी. लांबीचे शेतरस्ते, मजबुतीकरणाचे काम झालेले 300 कि.मी. लांबीचे शेतरस्ते, 1090 जनावरांचे गोठे, 12 हेक्टर क्षेत्रावरील फळबाग ही सर्व शेतकरी हिताची कामे सुमारे 51 कोटी रुपये खर्चाची आहेत. या कामासाठी मनरेगा-नरेगा, आमदार निधी, इतर योजनांतून निधी मिळविला.

या कामाशिवाय निम्न तेरणा प्रकल्प, माकणी धरणात साठलेला गाळ काढण्याचे आणि माकणी ते शहाजनी औराद या 40 कि.मी. लांबीच्या तेरणा नदीपात्राचे खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ‘भारतीय जैन संघटना’, ‘आर्ट ऑफ लिविंग व नाम फाउंडेशन’ संस्थांची मदत मिळत आहे. 

मनरेगाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एकाचवेळी विविध योजनांचा लाभ कसा मिळू शकतो हे औसा पॅटर्नमधून समोर आले होते. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ही योजना जिल्हाभर राबविण्याची सूचना केली होती. शिवाय आ. पवार यांनी शेतीत होणारी विविध कामे व शेतीसाठी उपयुक्त गोष्टींचा मनरेगात समावेश असावा अशी मागणी नोव्हेंबर 2020 रोजी रोहयोचे सचिव नंदकुमार वर्मा यांच्याकडे केली. या संकल्पनेचे फायदे लक्षात घेऊन 9 डिसेंबर 2020 रोजी राज्य मंत्रीमंडळाने ‘शरद पवार ग्राम समृद्धी योजने’त औसा पॅटर्न अंतर्गत केल्या जात असलेल्या कामाचा समावेश करून मनरेगाच्या कामाची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेत जनावरांचा गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे. या संदर्भातील शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2021 मध्ये काढण्यात आला आहे. अशा पद्धतीने हा औसा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे. 

शेतरस्ते/पाणंद रस्त्यावरून शेतकर्‍यांत वाद असतात. न्यायालयात अशा वादांची संख्या प्रचंड आहे. अशा अवघड कामात शेतकर्‍यांना, गावातील गटा-तटांना, विविध पक्षांच्या स्थानिक पुढार्‍यांना तयार करण्याचे आणि प्रशासनाचे सहकार्य प्राप्त करण्याचे अवघड काम आ. पवार यांनी संवादातून, लोकसंपर्कातून केले. अर्थात स्वपक्षासोबतच तत्कालीन महाविकास आघाडीतील संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी व पालकमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेऊन शेतकरी हिताची कामे मार्गी लावण्यात आ. पवार यशस्वी ठरले आहेत. 

शेतरस्त्याची चांगली कामे झाल्याची मते या भागातील शेतकरी नोंदवितात. स्वतःच्या व एकमेकांच्या शेतात जाऊ शकतो, शेतात गाड्या येऊ शकतात व शेतमाल वेळेत बाजारात जात असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महिला शेतकरी व महिला शेतमजुरांना सहजपणे शेतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय फळबाग योजना असंख्य शेतकरी राबवू लागले. फळबाग योजना आणि रस्ते झाल्याने शेतकरी भाजीपाला, फळबाग, नर्सरी, रेशीम, ऊस इत्यादी अधिक उत्पादन देणार्‍या पिकांकडे वळू लागले. शिवाय दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी जोडधंदे करू लागले. या भागातील शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासाला औसा पॅटर्नमुळे गती प्राप्त झाली आहे. असंख्य फायदे मिळत असले तरी मशिन्स्चा अतिवापर होत असल्याने मजुरांना मिळणारी कामे कमी होत आहेत. त्यामुळे मजुरांना करण्याजोेग्या कामांची संख्या वाढवून त्यांच्या हाताला अधिक रोजगार मिळावा अशा प्रतिक्रियाही पुढे येत आहेत. अतिवृष्टीमुळे केवळ मातीकाम झालेले शेतरस्ते खराब झाले. त्यामुळे शेतरस्त्याच्या कामाचे मजबुतीकरणाचे काम वेगाने करण्याची मागणीदेखील शेतकरी करीत आहेत. 

पुढील काळात मतदारसंघातील सर्वच गावातील शेतरस्ते आणि इतर ग्रामविकासाच्या योजना राबविण्याचा आ. अभिमन्यू पवार यांचा मानस आहे. खरंतर ग्रामीण नेतृत्व किंवा आमदारांना सहकार क्षेत्र, जिल्हा बँक, पतसंस्था, शैक्षणिक संस्थांचे मोठे पाठबळ असते. पण या आर्थिक संसाधनांचा उपयोग ग्रामविकासासाठी करण्याची इच्छाशक्ती सर्वच नेतृत्वात नसते. सहकार किंवा शिक्षण संस्थांची पार्श्‍वभूमी नसताना आणि पहिल्यांदाच निवडून येऊनही आ. अभिमन्यू पवार यांनी ग्रामविकास, शेतकरी हिताच्या आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीचा राज्याने दखल घ्यावा असा औसा पॅटर्न प्रत्यक्षात उतरवला आहे. 

(प्रस्तुत लेखासाठी निवृत्ती (बापू) सुगावे, वामन जगताप, डॉ. उमाकांत जाधव यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीचा वापर केला आहे. त्याबद्दल या तिघांचेही आभार!)

-----

- लेखिका ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’च्या संपादकीय विभागात कार्यरत आहेत.

Previous
Next Post »