दलित पँथर : काल, आज आणि उद्या
प्रा. प्रकाश मा. पवार | महाराष्ट्र वार्षिकी 2023 (वर्ष 14 वे)
दलित पँथरने सुरुवातीच्या एक दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सार्वजनिक जीवनात प्रभावशाली भूमिका बजावली, पँथरने दलितांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक जीवनात आमूलाग्र बदल केला. अस्तित्त्वाबरोबरच अस्मिता ही महत्त्वाची असते, हे रुजवण्यात ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे दलित पँथरमुळे दलिताचे स्वतंत्र राजकरण उभे केले, स्वाभिमानाला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले, लाचार राजकारणावर फटकारे मारले, पँथरच्या चळवळीने नवी राजकीय भरती केली, तरुणांचा सहभाग वाढवला, मागास समाजातील मरगळ झटकून टाकली आणि परिवर्तनाच्या चळवळीचं नवं चैतन्य निर्माण केले.
दलित पँथरची निर्मिती ही महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक, राजकीय जीवनातील एक ऐेतिहासिक घटना आहे. ह्या निमित्ताने ती समजावून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दलित पँथर ही आंबेडकर उत्तर राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक, राजकीय, तरुणाची आक्रमक संघटना होती तिचा परिणाम केवळ दलितांवर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाज जीवनावर झाला. दलित पँथरची स्थापना 9 जुलै 1972 रोजी औपचारिकरीत्या नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले इत्यादी तरुणांनी केली. तिची निर्मिती म्हणजे व्यवस्थेला दिलेली जबरदस्त प्रतिक्रिया होती. दलित पँथरने सुरुवातीच्या एक दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सार्वजनिक जीवनात प्रभावशाली भूमिका बजावली, पँथरने दलितांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक जीवनात आमूलाग्र बदल केला. अस्तित्त्वाबरोबरच अस्मिता ही महत्त्वाची असते, हे रुजवण्यात ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे दलित पँथरमुळे दलिताचे स्वतंत्र राजकरण उभे केले, स्वाभिमानाला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले, लाचार राजकारणावर फटकारे मारले, पँथरच्या चळवळीने नवी राजकीय भरती केली, तरुणांचा सहभाग वाढवला, मागास समाजातील मरगळ झटकून टाकली आणि परिवर्तनाच्या चळवळीचं नवं चैतन्य निर्माण केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर निष्क्रिय झालेले नेते तसे रिपब्लिकन नेत्यांनी विद्रोही आंबेडकरवादाशी केलेली बेईमानी म्हणनूच दलित तरुणांनी पँथरसारखी विद्रोही संघटना जन्माला घातली असे मत कॉ. शरद पाटील ह्यांनी नमूद केले. तर भारतीय सांमतशाहीने कल्याणकारी राज्यावर घाला घातल्याने दलित तरुणांना आक्रमण संघटना उभी करावी लागली असे मत डॉ. रावसाहेब कसबे व्यक्त करतात. तर पँथर नेते, साहित्यिक प्रा अरुण कांबळे, ह्यांनी रिपब्लिकन नेत्यांनी दलित समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले नाही. त्याच वेळी दलित साहित्याने शिक्षित तरुणांमध्ये नव्या जाणिवा, नव्या वाटा विकसित केल्या असं मत नोंदवतात. तर पँथरवर संशोधन करणार्या अभ्यासिका डॉ. लता मरूगकर ह्यांनी दलित पँथरच्या निर्मितीचे पाच घटक सांगून तिचे विश्लेषण करतात. त्यांच्या मते पँथरची निर्मिती खालील घटकामुळे झाली.
1. त्या काळातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती.
2. दलित युवकांमधील जाणिवा, सांस्कृतिक संघर्ष ह्यांचा झालेला विकास.
3. दलितांवरील वाढते अत्याचार.
4. इतर बंडखोरी चळवळीचा झालेला परिणाम.
5. बंडखोर, स्फोटक, दाहक दलित साहित्याची प्रेरणा ही होय.
स्वातंत्र्यानंतर भारतात खरी लोकशाही प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारतील शासनकर्त्या वर्गावर होती. अपवादात्मक पंडित जवाहरलाल नेहरूसांरख्या नेत्यांना त्यांचे भानही होते. त्यासाठी त्यांनी काही संस्थाही उभ्या केल्या होत्या. पण त्याची व्यापकता आणि परिणामकारकता पुढच्या पिढीत वाढवायला हवी होती. पण त्यांच्याकडून झाली नाही त्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरवादी हे ह्याबाबत सतर्क होते. पण स्वातंत्र्यानंतर पुढील पंचवीस वर्षांत त्याचा प्रत्यय आला नाही. ह्या पंचवीस वर्षांत चार पंचवार्षिक योजना, पाच सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका, विविध राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका, दोन युद्धे झाली. पण सामान्य माणसांच्या आयुष्यात फार मोठे बदल झाले नाही. समता, स्वातंत्र्यापासून तो दूरच राहिला. त्यांच्या पाठीमागचे दारिद्र्य आणि शोषण संपले नाही. म्हणूनच स्वातंत्र्य हे कुठल्या रंंडकीचे नावं आहे! असा संतप्त सवाल नामदेव ढसाळ विचारात होते, तर राजा ढाले हे साधना साप्ताहिकात आपल्या संतप्त भावना व्यक्त करत होते. त्यामुळेच राजा ढाले ह्यांचा स्वातंत्र्याने काय दिले हा लेख पँथरच्या निर्मितीस तात्कालिक कारण ठरला असला तरी त्या पाठीमागे वरील पार्श्वभूमी होती.
दलित पँथरला जरी आता पन्नास वर्षे पूर्ण होत असली तरी तिचा प्रभावशाली कालखंड सुरुवातीचाच राहिला. सुरुवातीचा तिचा झंझावात सर्वांना अचंबित करणारा होता. अस्वस्थ समाजाला तो आशेचा किरण दिसत होता. दलित पँथर जरी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी शहरांत उदयाला आली असली तरी ती अतिशय अल्पकाळात मध्ये महाराष्ट्राच्या खेडोपाडी, वाडा वस्त्यांवर पोहोचली होती. नंतर ती महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश ह्या राज्यांतही पोहोचली होती. पँथरच्या निर्मितीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात जात वर्ग समन्वय विरोध अशी व्यापक चर्चा घडली, पँथरमधील एक गट मार्क्स आंबेडकर समन्वयवादी होता तर दुसरा पारंपरिक होता. पण ह्या चर्चेमुळे दलित राजकारणात सिद्धांत आणि विचार प्रणालीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे आंबेडकर इतर आंबेडकरवादाचा विकास होण्यास हातभार लागला. दलित पँथरने आरंभीच्या काळात जे भरीव काम केले त्यात प्रामुख्याने सरकारी निमसरकारी क्षेत्रातील आरक्षण भरतीसाठी केलेले आंदोलन. त्यांची फलश्रुती म्हणजे आज मोठा प्रमाणात सेवेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती, जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग दिसतो, पँथरने सरकारी क्षेत्रातील आरक्षणाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही मोठे काम केले. शिष्वृत्ती वाढीसाठी केलेली आंदोलने तर ऐतिहासिक ठरली. त्यामुळेच घरची परिस्थिती अतिशय गंभीर असतानाही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेऊन स्वतःची समाजात सन्मानाची ओळख करू शकले. पँथरने सर्वात प्रभावी केले ते दलितांवर जो गावगाडयात हल्ला होत होतात तो आक्रमकपणे रोखला काही प्रसंगी प्रतिहल्ला केला. पँथरच्या अत्याचारविरोधी भूमिकेमुळे आणि देशभरात वाढत्या अत्याचाराचे स्वरूप लक्षात घेता भारताच्या संसदेला 1989 साली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार (प्रतिबंधक) कायदा करावा लागला आणि अत्याचार मुक्त भारत ध्येय निश्चित करावे लागले. ह्याशिवाय महागार्ई, बेरोजगार, झोपडपट्टीतील नागरी सुधारणा, महार वतनाच्या जमिनी गायरानातील जमिनी दलितांना मिळाव्यात ह्यासाठी केलेली आंदोलने, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे ह्यासाठी केलेली आंदोलने अशा कार्यक्रमांना पँथरने प्राधान्य दिले आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला.
1990 साली दलितांवरील अत्याचार पुन्हा वाढू लागले, दलित समाजात फूट आल्याने हे अत्याचार वाढत होते. ते रोखण्याच्या हेतूने दलित ऐक्य प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच 1991 साली मुंबईमधील दादरच्या शिवाजी पार्क मैदानात रामदास आठवले गटाच्या भारतीय दलित पँथर आणि नामदेव ढसाळ प्रणित दलित पँथर रिपब्लिकन पक्षात विलीन झाला. पण काही महिन्यात ऐक्य प्रणित रिपब्लिकन पक्षात फूट पडली आणि नामदेव ढसाळांनी दलित पँथरचा गट कायम ठेवला. पँथरने गरज वाटल्याने काही तुरळक ठिकाणी पँथरच्या छावण्या आहेत पण पँथरच्या चळवळीतून जो कार्यकर्ता तयार झाला तो मात्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक राजकारणात क्रियाशील आहे.
दलित पँथरच्या जडणघडणीत दलित पँथरच्या नेतृत्वाचा वाटा मोठा आहे त्यांची एक स्वतःची वैशिष्टे आहे. ती पुढीप्रमाणे -
1. पँथरच्या सर्व नेत्याची वय 20 ते 30 वयोगटातील होते.
2. पँथरचे नेतृत्व संवेदनशील, भावनाविवश, साहित्यिक होते
3. नेत्यांकडे धैर्य, धाडस, कमालीची आक्रमकता होती.
4 त्यांच्यापैकी कोणालाही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
5. पँथरचे नेते चाळीत, झोपडपट्टीत, कामगार वस्तीत राहणारे कनिष्ठ वर्गातून आलेले होते.
6. दलित पँथरमध्ये संघटनात्मक लोकशाहीचा अभाव होता.
7. दलित पँथरच्या नेत्यांनी ज्या कारणामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर टीका केली तेच मुद्दे पँथरच्या नेतृत्वात पुढे दिसू लागले.
पँथरच्या नेतृत्वात जरी कमी-अधिक उणिवा असल्या तरी त्यांनी उभे केलेल्या चळवळीचे महत्त्व असाधारणआहे. त्याचे योगदान महाराष्ट्राच्या जडण घडणीत अत्यंत महत्त्वाचे आहे. पँथरचा झंझावात कमी झाला असला तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही कारण सत्तरच्या दशकांतील प्रश्न आजही संपले नाहीत. उलट 1990 नंतर आलेल्या जागतिकीकरणात ते जटिल बनले आहेत. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण केले जात आहे त्यातून कल्याणकारी राज्य संपुष्टात निघाले आहे. सरकार सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, मागासलेल्या समुदायाचे की भांडवलदारांचे मागच्या तीन दशकांत सरकारवर प्रभाव मूठभर भांडवलदरांचा राहिला. त्यामुळे समाजात तर विषमता वाढलीच पण सामान्य माणूस सर्वच लाभांपासून वंचित राहिला. मागची तीन दशके भारत अस्मितेच्या राजकारणाची राहिली. त्यात धार्मिक आणि जातीय अस्मिता जागृत करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जातिवाद पराकोटीला गेला आहे, अत्याचाराचे प्रमाण कमी न होता ते दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच चळवळी क्षीण होत आहेत. सामान्य माणसाची अगतिकता वाढत आहे. महागाई, बेरोजगारी ह्या समस्या वाढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पँथरचे महत्त्व महत्त्वाचे वाटते. पँथरने दिशा दिली आहे तो एक विचार आहे. कदाचित ती क्षीण असेल, पण संपली नाही तिची गरज आजही आहे, ती संपली असे वाटत नाही. सत्तरीच्या दशकात सामना चित्रपट आला होता. तो खूप गाजला. आजही त्याचा प्रभाव मराठी माणसावर आहे. सामना चित्रंपटातील मारुती कांबळेचे काय झालं असं जाब विचारणार्या मास्तरची गरज समाजाला आहे त्यामुळे पँथर अभी जिंदा है असं म्हणावं लागेल.
-----------
- लेखक पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.

ConversionConversion EmoticonEmoticon