मुलगी देता का हो मुलगी...
अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर | महाराष्ट्र वार्षिकी 2023 (वर्ष 14 वे)
लग्न न ठरण्याचे मुख्य कारण नोकरी नसणे हे असले तरी या समस्येचे बीज रुजलं गेले ते पंचवीस तीस वर्षांपूर्वी. वंशाला दिवा हवाच या अट्टाहासापोटी सोनोग्राफी तंत्राचा गर्भलिंग चिकित्सेसाठी वापर करण्यात आला आणि अगणित मुलींची गर्भातच हत्या केली गेली. याचा परिणाम म्हणजे स्त्री पुरुष लिंगोत्तर प्रमाण बिघडले त्याचा एक परिणाम म्हणजे लग्नाच्या वयात आलेल्या मुले आणि मुलांचे प्रमाण यात फरक पडला. त्यामुळे मुलींची सख्या घटली गेली.
बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. काळ बदलत राहतो. काळाबरोबर समाजही पुढे पुढे जात राहतो. समाजातील काही समस्या दूर होत जातात तर काही समस्या नव्याने निर्माण होतात. काळ बदलला म्हणून समस्या संपतात असे नाही तर प्रत्येक काळाला त्याच्या त्याच्या समस्या असतातच. बदलते ते फक्त समस्यांचे स्वरूप.
काही समस्या सुटतात, काही अर्धवट सुटतात, तर काही सुटत नाहीत. प्रत्येक समस्येचे चांगले वाईट परिणाम काळानुरूप पुढील पिढीला भोगावे लागतात. आज ज्ञान, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान सर्व काही आपल्या सोबतीला आहे. त्याचा सुयोग्य वापर करून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहेच. याचबरोबर वर्तमानातील कोणत्याही वर्तणुकीचा समाजावर दूरगामी नकारात्मक परिणाम होणार नाही याचं भान ठेवणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भूतकाळातील अनेक सामाजिक विचार आचारांचा व्यापक असा परिणाम नेहमीच महिलांच्या जीवनावर होत आला आहे. मात्र काळानुसार या परिणामांची दिशा आता पुरुषांच्या जीवनाकडेही वळली आहे. सामाजिक समस्यांचा परिणाम पुरुषांच्या जीवनावरही होऊ लागला आहे.
त्याचे पहिले रूप म्हणजे गेल्या दशकात तळेश्रशपलश असरळपीीं चशप ही चळवळ सुरू झाली आणि दुसरे रुप म्हणजे लग्नासाठी आज तरुणांना मुली मिळत नाहीत. सध्या ते रूप छोटे असले तरी लवकरच याची तीव्रता वाढत जाणार आहे. उपवर मुलांच्या लग्नाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललीय कारण लग्नासाठी बँडबाजावराती आवश्यक ते सगळेच आहे, फक्त मिळत नाही ती वधू. वयवर्षे 25 ते 40 या वयोगटातील अनेक उपवर मुलांची लग्ने अक्षरशः रखडली आहेत ती केवळ मुलगी मिळत नाही या कारणाने. विशेषतः ग्रामीण भागात याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून मुलगी देता का हो... मुलगी? असं म्हणण्याची वेळ आज उपवर तरुण आणि त्यांच्या पालकांना आली आहे.
सोलापुरात लग्न न ठरणार्या उपवर मुलांनी मोर्चा काढल्याची बातमी येऊन धडकली आणि या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली. या विषयाची तीव्रता लक्षात घेता लवकरच हा एक मोठा सामाजिक प्रश्न होणार आहे. कारण आपल्या भारतीय समाजात विवाहास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आमचं लग्न जमत नाही, कोणी मुलगी लग्नासाठी होकार देत नाही... आम्ही बेरोजगार तर मुलींच्या, त्यांच्या पालकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? आमचे लग्न नाही झाले तर? यासाठी कोण जबाबदार? अशा प्रश्नांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 21 डिसेंबर 2022 रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे यातील काही सहभागी मोर्चेकरी तरुण चक्क फेटा मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या वेशात होते तेही चक्क घोड्यावर वरात घेऊन सहभागी झाले होते, जणू लगेच जाऊन बहुल्यावर उभा राहणार आहे.
कुणी मुलगी देता का मुलगी!!!, भविष्यात मला बायको मिळेल का? अशा घोषवाक्यांच्या फलकांसह बेटी बचावो बेटी पढावो, गर्भलिंग प्रतिबंध तरतुदींची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणी यात केली होती. याचाच अर्थ या मोर्चात सहभागी तरुणांना या समस्येच्या मुख्य कारणांची नक्कीच जाणीव झाली आहे.
या मोर्चाकडे अनेकांनी मनोरंजन म्हणून पाहिले असले तरी हा वाटतो तितका साधा प्रश्न नाही. समाजात जेव्हा एखाद्या समस्येच्या अनुषंगाने एक दोन घटना घडतात, एखाद्या समस्येची दोन चार उदाहरणे समोर येतात, तेव्हा त्या समस्या वैयक्तिक असतात. मात्र एखाद्या समस्येची, घटनेची संख्या वाढत गेली तर मात्र ती सामाजिक समस्या बनते. मुलांची लग्न नं ठरणे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
पूर्वी सर्वच मुलांची लग्न होत होती असे नाही. प्रत्येक गावात एकदोन मुले असायची, ज्यांची काही कारणाने लग्न होत नसायची. त्याचं बाशिंग जड आहे असे लोक म्हणायचे. लग्न न झालेले एखाद दुसरे उदाहरण समाजात दिसायचे. पण आज ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि म्हणूनच आज हा प्रश्न केवळ वैयक्तिक न राहता सामाजिक समस्या बनली असून त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनाला आणि महत्त्वाचे म्हणजे शारीरिक लैंगिक संबंधांना सामाजिक, कौटुंबिक मान्यता प्राप्त होण्यासाठी विवाह हा महत्त्वाचा घटक आहे. भारतीय पार्श्वभूमीवर त्यास सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक आशय लाभला आहे. धार्मिक दृष्टीने विवाह हा संस्कार असून सामाजिक दृष्टीने या संस्कारास सामाजिक नीतिमूल्याची जोड दिली गेली आहे. एकूणच स्त्री आणि पुरुष हे निसर्गातील दोन भिन्न घटक असून, कायद्यानेही त्यांना वेगवेगळे व्यक्ती म्हणून मान्यता आहे. असे असले तरी लैंगिक संबंधासाठी एकत्र येण्याचे सामाजिक स्वातंत्र्य अजूनही आपल्या समाजात विवाह या संकल्पनेत बंदिस्त झालेले असल्याने भारतीय समाजात विवाहास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
माणसाने नागरी जीवनात प्रवेश केल्यानंतर धर्म संकल्पना अस्तित्वात आली. त्यामध्ये ठरवून विवाह होण्याची संकल्पना व्यापक अर्थाने समाजात दृढ झाली. अलीकडच्या काळात प्रेम विवाह, आंतर-जातीय, आंतर-धर्मीयविवाहास काही अंशी समाजात कुटुंबात मान्यात मिळू लागल्याचे चित्र दिसत असले तरी साधारणतः नव्वद टक्के विवाह हे ठरवून होतात. या सामाजिक पार्श्वभूमीवर सोलापुरात काढला गेलेला मोर्चा हा महत्त्वाचा ठरतो.
सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. भावाच्या फूड फॅक्टरीत काम करणार्या मुलाचा फोन आला. ताई एक महत्त्वाचं काम आहे. तुमच्या ओळखीच्या गुरुजींकडून पुढील आठवड्यातील लग्नाचा मुहूर्त बघून मला सांगा. आणि हो ही गोष्ट कोणालाही अगदी सर, दाजी कोणालाही सांगू नका. कधी नव्हे ते लग्न ठरतंय तर लग्न व्हायला हवं. आताच कोणाला नाही सांगायचे. दोन चार वेळा लग्न ठरून मोडलेला हा युवक. गुरुजींना विचारून त्याला मुहूर्त विषयी माहिती दिली. पण चार दिवसांनी कळले की हेही लग्न ऐनवेळी मोडले का? तर मुलाला चांगली नोकरी नाही.
एकाचा मोठा वाडा आहे. भरपूर बागायती जमीन आहे. रस्त्याच्या कडेला करोडो रुपयांची जागा आहे. पण शेतकरी असल्याने त्याला सर्व मुलींनी नकार दिला आहे. नोकरी आहे, दोन चार एकर शेती आहे पण स्थळ येणार्या मुली त्याच्यापेक्षा जास्त शिकलेल्या असल्याने त्याला नकार मिळत आहे.
एकदम सधन घरातील तो विवाह इच्छुक मुलगा आहे. पस्तिशीला आलाय. भरपूर शेती, मोठा बंगला, दारापुढे चार गाड्या, तो स्वतः देखणा... कशाचीच कमी नाही. पूर्वी अशा मुलांच्या घरापुढे मुलींच्या पालकांची रांग लागलेली असायची. पण आता हे चित्र पूर्णतः बदलले आहे. तो शेतकरी आहे या कारणाने एकही मुलगी या स्थळाला लग्नासाठी होकार देत नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आसपास दिसतील.
नेमकी समस्या काय आहे?
साधारणत: वयवर्षे 22 ते 28 पर्यंत मुलांची लग्ने हमखास होतात. परंतु आज ग्रामीण भागात वय वर्षे 28 ते 35/40 या वयोगटातील अविवाहित मुले मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. वेगवेगळ्या गावात या समस्येविषयी चर्चा केली असता प्रत्येक गावातील परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. दोन ते तीन हजार लोकसंख्येच्या गावात 40 वयवर्षेवरील साधारणतः पन्नास एक मुले अविवाहित आहेत. ज्यांनी आता आपले लग्न होईल ही आशाच सोडून दिली आहे. तर 35 वर्षांवरील शंभर एक मुले अजूनही आपले लग्न होईल अशी आशा धरून आहेत. 28 ते 35 वयोगटातील मुले व त्यांचे पालक मुलगी मिळेल या अपेक्षेने दररोज जोडे झिजवत आहेत. (पूर्वी जोडे झिजवणे हा वाक्यप्रचार मुलीचे लग्न जमवण्यासाठी तिच्या वडिलांची अवस्था सांगण्यासाठी वापरला जायचा आता परिस्थिती उलट बनली आहे.)
शहरी भागातही लग्न न ठरण्याचे प्रमाण आहे. पण लोकसंख्येच्या गर्दीत अजून अशी उदाहरणे लगेचच समोर येत नाहीत. शिवाय मुलगा शहरातील असणे ही शहरातील मुलांची एक जमेची बाजू असल्याने अजून तेवढी तीव्रता शहरात जाणवत नाही. एकूणच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही समस्या अधिक बिकट आहे. यावर संशोधन झाले तर कदाचित हा आकडा वाढू शकतो असे लोकांशी चर्चा करताना लक्षात आले.
या लग्न नं ठरणार्या मुलांमध्ये 99 टक्के मुले ही नोकरी न करणारी आहेत. यातील काही शेती करतात, काही शेतीपूरक व्यवसाय करतात, काही छोटे मोठे उद्योग व्यवसाय करतात. काही मुले निव्वळ आई वडिलांच्या कमाईवर अवलंबून आहेत. काही बी.ए., बी.कॉम., डिप्लोमा आहेत. पण नोकरी नाही, शिक्षण असल्याने शेती व इतर कामे करायची लाज वाटते. म्हणून स्वतः काहीही कामधंदा न करता निवांत बसून आईवडिलांच्या कमाईवर जगत आहेत. तर काही गावाच्या राजकारणात दादा, अण्णा भाऊ अशा राजकीय नेत्यांच्या मागे फिरतात. या मुलांना मुलगी कोण देणार? हा जसा प्रश्न आहे तसाच यांना का मुलगी द्यावी? हाही प्रश्न महत्त्वाचा आहेच.
लग्न न ठरण्याची कारणे
लग्न न ठरण्याची कारणे या विषयावर अनेकांशी संवाद साधला असता नोकर्या नाहीत, मुलींना सासू सासरे जबाबदार्या नकोत, मुली शिकल्याने त्यांचे विचार बदलले आहेत असा समाजात सूर दिसून येतो. पण ही चर्चा फार वरवरची आहे.
लग्न न ठरण्याचे मुख्य कारण नोकरी नसणे हे असले तरी या समस्येचे बीज रुजलं गेले ते पंचवीस तीस वर्षांपूर्वी. वंशाला दिवा हवाच या अट्टाहासापोटी सोनोग्राफी तंत्राचा गर्भलिंग चिकित्सेसाठी वापर करण्यात आला आणि अगणित मुलींची गर्भातच हत्या केली गेली. याचा परिणाम म्हणजे स्त्री पुरुष लिंगोत्तर प्रमाण बिघडले त्याचा एक परिणाम म्हणजे लग्नाच्या वयात आलेल्या मुले आणि मुलांचे प्रमाण यात फरक पडला. त्यामुळे मुलींची सख्या घटली गेली.
रेशीमगाठी विवाह मंडळाचे संचालक सुधाकर देशमुख सांगतात पंचवीस वर्षांपूर्वी एक एक मुलगा 100-100 मुली नाकारायचा. आज परिस्थिती उलट होत चालली आहे. एका उपवर मुलीसाठी कित्येक मागण्या येत आहेत. पूर्वी मुलीचे लग्न ठरवताना पालकांची दमछाक व्हायची आता मुलांचे पालक स्वतःहून मुलींच्या पालकांकडे येत आहेत.
दुसरे कारण म्हणजे शिक्षणाच्या संधीचा फायदा मुली पुरेपूर करून घेत आहेत. कोणत्याही महाविद्यालयात जा, तिथे मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक दिसून येते. याउलट मुलांमध्ये शिक्षणाविषयी प्रचंड अनास्था दिसून येते. याचे फलित म्हणजे आज उच्च शिक्षण घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुलांची लग्न न ठरण्याचे शिक्षण हे ही एक कारण आहे.
आज मुली चांगले उच्च शिक्षण घेत आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी घेऊन मोठमोठ्या पदांवर नोकर्या करत आहेत. त्या तुलनेने मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात दहावी बारावी फारतर बी.ए. इथपर्यंत मुलांचे शिक्षण आहे. या मुलांकडे ना शिक्षण ना नोकरी. मग कोणते आईवडील अशा मुलांना आपली मुलगी देतील?
पूर्वी लग्न ठरविताना मुलांना अजिबात विचारले जात नव्हते. आम्ही तिचे भले पाहतो असे म्हंटले जायचे. प्रत्येक पालक मुलीचे भले व्हावे हा उद्देश ठेवतात. त्याच विचारसारणीला अनुसरून आज पालक मुलींच्या विचारांना महत्त्व देऊ लागले आहेत. शिकलेला नोकरी करणारा मुलगा हवा ही सर्वच मुलींची मागणी आहे. आणि ती गैर आहे असेही नाही.
याचबरोबर मुली पार्लर, शिवणकाम व इतर कौशल्य घेऊन व्यवसाय करत आहेत. शहर असो व ग्रामीणभाग, जवळपासच्या कंपन्यांमध्ये मिळेल ते काम स्वीकारून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. याउलट मुलांची परिस्थिती आहे. शिक्षण नाही की नोकरीही नाही. नोकरीच्या संधी अगदीच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय मिळेल ती नोकरी करण्यात कामाची प्रतिष्ठा आडवी येते. शेती करण्यात रस नाही. काहीही कामधंदा न करता बहुतांशी मुले तर राजकीय नेत्यांच्या मागेपुढे फिरत आहेत. या मुलींना मुलगी कोण देणार?
उत्तम शेती करणार्या मुलांचे प्रमाण भरपूर आहे. पण लग्नाच्या बाजारात त्यांनाही किंमत नाही. शेतकरी नवरा नको गं बाई अशी मानसिकता केवळ मुलींचीच नाही तर त्यांच्या पालकांचीही दिसून येते. वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेणार्या मोठाले बंगले गाड्या असणार्या मुलांचे लग्न ठरत नाही ते केवळ शेती करतात म्हणून. याची दुसरी बाजू म्हणजे नोकरीवाला मुलगा हवा पण त्याला सोबत शेतीही हवी अशी मुलींची व पालकांची मागणी दिसून येते. यावर काही मुले लग्न जमावे म्हणून शहरात छोटी मोठी नोकरी करतात व लग्न झाले की नोकरी सोडून देतात याचा परिणाम पुन्हा संसारावर होताना दिसून येतो. त्याचे रूपांतर कौटुंबिक खटल्यांमध्ये होते.
या समस्येवर उपाय म्हणून रेशीमगाठी विवाह मंडळाने शेतकरी मुलाशी लग्न करणार्या मुलींची मोफत नाव नोंदणी योजना राबविली होती. या योजनेला प्रतिसाद अर्थातच शून्य होता. तसेच शेतकरी नवरा करणार्या मुलींच्या पालकांना लग्नासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही असेही सांगण्यात येते. पण यासही प्रतिसाद मिळत नाही. त्या अनुभवाविषयी रेशमी गाठीचे संचालक सुधाकर देशमुख सांगतात आम्हाला फुकट नाव नोंदणी नको, आम्ही पैसे देऊन नाव नोंदणी करतो पण आम्हाला नोकरी करणारा आणि शहरातीलच मुलगा हवा असे मुलींनी त्यांना सांगिलते. ते पुढे सांगतात मुलगा शेती करतो म्हणून लग्न जमत नाही अशा कुटुंबात मुलींचे लग्न जमवताना या पालकांनाही नोकरीवालाच मुलगा हवा आहे.
शहरातील नवरा हवा हेही मुलांची लग्न न जमण्याचे एक कारण आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागातील मुलींना पुण्या-मुंबईतील नवरा हवा आहे. कोकणातील मुलींना मुंबईतील मुलगा हवा आहे. हे लोण विदर्भातही मोठ्या प्रमाणावर असल्याचे गडचिरोलीतील मैत्रीण अॅड. पल्लवी केदार यांनी चार वर्षांपूर्वी सांगितले होते आणि आजही परिस्थिती बदललेली नाही. गडचिरोली व आसपासच्या भागातील मुलीला नागपुरातच राहणारा मुलगा हवा आहे. गावातील मुलगा नको, गावात राहायला नको असे अनेक मुली सांगतात. कारण शहरात जरी धावपळीचे कष्टाचे जीवन असले तरी तिथे संसाराच्या जोखडातून काही काळ मोकळीक मिळते. आचार विचाराचे स्वातंत्र्य मिळते जे ग्रामीण भागात मिळत नाही.
याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे मुलगी म्हणजे ओझं ही मानसिकता बदलत चालली आहे. लग्न जमवण्याच्या प्रक्रियेत मुलीचे दिसणे, शिक्षण, पालकांची परिस्थिती यास आता अजिबात महत्त्व उरले नाही. तुम्ही फक्त मुलगी द्या आम्ही सर्व खर्च करतो असे केवळ म्हणत नाहीत तर खर्चाचे पैसे घेऊन मुलाकडील लोक तयार असतात. तरीही मुली तयार होत नाहीत यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते.
मुलगी कशी हवी या अपेक्षेची मुलगा आणि पालकांची मोठी यादी असायची. या मुद्द्याच्या अनुषंगाने अनेक विवाह इच्छुक प्रौढ तरुणांशी संवाद साधला असता आता त्यांच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. हुंडा नको, मानपान नको, तिचे दिसणे नको... फक्त मुलगी हवी एवढी एकच अपेक्षा. थोडक्यात त्यांच्यासमोर केवळ लग्न होणे एवढेच महत्त्वाचे आहे.
पूर्वी विदुर, घटस्फोटित वर असेल तर त्यालाही कुमारिका मुलीशीच लग्न करायचे असायचे. पण आता घटस्फोटित, विधवा, वयाने मोठ्या मुली मिळाल्या तरी चालतील असे विवाह इच्छुक मुले सांगताना दिसतात. अगदी जात धर्म प्रांताच्या सीमारेषा मिटत चाललेल्या दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मुली मिळत नाहीत म्हणून मराठवाड्यातील मुलींशी लग्न केली जात आहेत.
मुलगी दिसायला सुंदर हवी कुमारीच हवी या मागण्या आता बदलल्या आहेत. याचबरोबर मुलापेक्षा वयाने मोठी मुलगी नको हा विचारही आता बदलू पाहत आहे. सगळंच काही अपेक्षेप्रमाणे जुळून येत असेल आणि मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी असेल तर चालेल, काही हरकत नाही असा विचार आता पुढे येऊ लागला आहे.
लग्न जमत नाही म्हणून केवळ मुलेच हताश आहेत असे नाही. तर मुलांबरोबरच अनेक पालक या विषयवार हताश झालेले दिसतात. मुलाचे लग्न होईल या अपेक्षेनेगावातील घर शेती सोडून शहरात चहाचा गाडा चालविण्यापासून छोटे छोटे व्यवसाय पालकांनी सुरू केले आहेत. कुठलीही मुलगी बघा पण आमच्या मुलाचे लग्न जमवा असे अगदी हतबलतेने सांगताना अनेक पालकांना मी स्वतः पहिले आहे.
लग्न न झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. उदाहरणादाखल साताराशहराच्या आसपास थोडे संशोधन केले तर सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्या सर्वच गावात लग्न न झालेल्या मुलांची संख्या किमान 50 ते 250 पर्यंत दिसून येते. या समस्येची तीव्रता खूप मोठी आहे. कोणतीही मुलगी चालेल पण लग्न झाले पाहिजे असे म्हणणारे अनेक लग्नाळू तरुण मी स्वतः पहिले आहेत.
या लग्न न झालेल्या मुलांच्या मित्रांशी चर्चा करायला गेले तर आपलं झालंय ना मग आपण दुसर्याचे कशाला बघत बसायचे असे काही लोकांनी उत्तर दिले. यात विनोदाचा भाग असला तरी लग्न न झालेल्या मित्रांच्या समस्या बघता आपण या समसेच्या कचाट्यातून सुटलोय असे वाटणे म्हणजे या लोकांना या समस्येचे गांभीर्य चांगलेच लक्षात आले आहे. म्हणून ही प्रतिक्रियाही मला तेवढीच महत्त्वाची वाटते.
अलीकडेच एक प्रवासात एस.टी. ला खूप गर्दी होती. सगळ्यात शेवटी कशीबशी एक जागा मिळाली. शेजारी बसलेले काका म्हणाले बसून घ्या गाडीला खूप गर्दी आहे. पौर्णिमा असल्याने वारीला लोक येतात. तुम्हीही नियमित येता का? असे त्यांना विचारले तर ते म्हणाले, पहिल्यांदाच आलोय. घरात मुलामुलींची लग्न जमत नाहीत. म्हणून नाथाला पाच वार्या करायला एकाने सांगितलंय म्हणून आज आलोय. काय करतात मुलंमुली असे विचारले तर ते सांगू लागले घरात आणि नात्यात एकूण 15 मुली लग्नाच्या आहेत. सर्वच शिकलेल्या. एक बँकेत मॅनेजर आहे. तिचा पुण्यात आणि मुंबईला एक एक फ्लॅट आहे. डॉक्टर आहे, एक मोठ्या पदावर अधिकारी आहे... अशी अशा शिकलेल्या आणि मोठं करिअर करणार्या या पोरी आहेत. पण यांच्या तोडीची स्थळे मिळत नाहीत. असे त्यांनी सांगितले.
मुलीपेक्षा कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायला आमची हरकत नाही पण मुलींच्या शिक्षणावरून परत घरात वाद व्हायला सुरुवात होते. कारण आपल्या समाजात अजूनही प्रत्येक बाबीत नवरा मुलगाच सरस असायला हवा हे गृहीतक पक्क डोक्यात बसलं आहे. असे त्या काकांनी सांगितले. याचाच अर्थ ही समस्या सोडवायची असेल तर समाजातील काही गृहीतके बदलायलाच हवीत.
मुलगी मिळवून देतो असे म्हणून फसवणुकीच्या घटनाही अलीकडच्या काळात सातत्याने उघडकीस येत आहेत. परराज्यातील, गरीब कुटुंबातील मुली लग्नासाठी मिळवून देतो असे सांगितले जाते. एखादी मुलगी आणली जाते लग्न लावून दिले जाते आणि त्या घरातील पैसे, दागदागिने घेऊन दुसर्या तिसर्या दिवशी पोबारा केला जातो अशा अगदी चित्रपटात घडाव्यात अशा बातम्या अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहेत. विवाह बंधनाच्या नात्यात न अडकता एकत्र राहण्याची लिव्ह इन रिलेशन ही पद्धत अलीकडच्या काळात भारतीय समाजात रुजू पाहत आहे. पण भारतीय समाज तेवढा प्रगल्भ नाही. त्यामुळे लिव्ह इन रिलेशन ही पद्धत रुजत असतानाच त्या एकत्र राहताना निर्माण होणारे वाद विवाद विकोपला जाऊन त्यातून गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अगदी खुनासारख्या गंभीर घटना यातून घडत आहेत. ग्रामीण भागात इतर कोणत्या नावाने असे नातेसंबंध छुप्या पद्धतीने असले तरी लिव्ह इन रिलेशन ही संकल्पना कितपत मान्य केली जाऊ शकते हा प्रश्न आहेच. मुलांचे विवाह न होणे या प्रश्नावर लिव्ह इन रिलेशन हे उत्तर पुढे अनेक समस्या निर्माण करणारे आहे. त्यामुळे स्त्री पुरुषांच्या शारीरिक/लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी विवाह संस्थेला पूरक पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन या संकल्पनेकडे पाहू शकत नाही.
मातृभूमी : अ नेशन विदाऊट वूमन हा 2005 मध्ये एक चित्रपट आला होता. यात राजस्थान येथील सामाजिक स्थितीवर आधारित स्त्री भ्रूण हत्या आणि त्यामुळे भविष्यात होणारी परिस्थिती असा त्याचा आशय होता. यात गावात मुलगीच शिल्लक राहत नाही. फक्त मुलगेच असतात. एका माणसाने मुलगी जन्माला आल्याचे लपवून तिचे पालनपोषण केलेले असते. गावातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. ती मोठी झाल्यावर जेव्हा गावातील लोकांना या मुलीविषयी कळते तेव्हा सगळेच तिच्यासाठी मागे लागतात अगदी एकाच घरातील चार भाऊ आणि त्यांचे वडीलही अक्षरशः तिची वाटणी करतात अशी कथा असलेला हा चित्रपट आहे. अजून ती परिस्थिती आपल्याकडे आली नसली तरी एकूणच या विषयाचे गांभीर्य मोठे आहे.
मुलगी देता का हो मुलगी... असे म्हणत फिरण्याची वेळ लग्न नं जमणार्या मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर आली आहे. एकूणच वरील बाबींचा विचार केला असता मुलांची लग्न न ठरणे ही आता त्या मुलांची किंवा कुटुंबांची वैयक्तिक समस्या राहिली नसून त्यास आता सामाजिक समस्येचे रूप आले आहे. सोलापुरातील मोर्चा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आज लोकांना गमतीचे वाटत असले तरी त्यातील विनोद बाजूला ठेऊन त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे हे नक्कीच. या समस्येवर लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा याचे परिमाण केवळ त्या वैयक्तिक कुटुंबांनाच नव्हे तर समाजाला आणि पुन्हा महिलांना भोगावे लागतील.
--------------
- लेखिका, कायदा अभ्यासक असून बाल कल्याण समिती (सातारा)च्या अध्यक्ष आहेत.

ConversionConversion EmoticonEmoticon