सत्यशोधक समाज : नाबाद 150 वर्षे
दिलीप चव्हाण | महाराष्ट्र वार्षिकी 2023 (वर्ष 14 वे)
सत्यशोधक समाज म्हणजे पुणे परिसरातील चळवळ होती, असा काहींचा समज आहे. पण तसे नाही. अलीकडे, जी. ए. उगले यांनी महाराष्ट्रभर विखुरलेल्या 596 प्रमुख सत्यशोधक कार्यकर्ते, लेखक, संपादक यांच्या विषयीच्या सखोल माहितीचे संकलन प्रसिद्ध केलंय; तसेच मुकुंदराव पाटील यांच्या अग्रलेखांच्या 5,000 हून अधिक पानांचे दहा खंड नुकतेच प्रसिद्ध झालेत. सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्यांची व्याप्ती आणि खोली यातून कळावी. सत्यशोधक विचारांच्या प्रभावात महाराष्ट्रात किमान एक हजार महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली गेली. महाराष्ट्रातील शेतकरी, स्त्री, जातीविरोधी, शिक्षण, कामगार चळवळी ह्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सत्यशोधक समाजाच्या उपज राहिलेल्या आहेत.
अशा पर्यावरणात कनिष्ठ जातींच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याची हमी बाळगता येत नव्हती. नवशिक्षित अभिजनवर्ग वासाहतिक सत्तेने शक्य केलेल्या माफक उदारमतवादावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. स्ववर्गवर्चस्वासाठी आवश्यक तेवढी आधुनिकता निवडून स्वीकारायची; मात्र अशा आधुनिकतेपासून कनिष्ठ वर्गीयांच्या मोठ्या समूहाला वंचित ठेवायचे, अशी या वर्गाची नीती होती. विशेषत:, सार्वजनिक सभा ही कमालीच्या अंतर्विरोधांनी ग्रस्त होती.
सत्यशोधक समाज मात्र कनिष्ठ जातींच्या हितसंबंधांच्या रक्षणाबाबत स्पष्टता राखून स्थापन करण्यात आलेली पहिली संघटना होती. फुल्यांनी हिंदू धर्मांतर्गत असलेल्या जातीय उतरंडीच्या रचनेला आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी गौतम बुद्ध, कवी अश्वघोष, संत तुकाराम, संत कबीर यांच्या परंपरेचा सुयोग्य विनियोग केला. परमहंस मंडळींसारखा सत्यशोधक समाजाने आपला हेतू लपवून ठेवला नाही. उलट, या समाजाची तत्त्वे एवढी उग्र होती की या समाजाच्या सदस्यांनादेखील ती अनुसरणे अवघड होते. बाबा पद्मनजींनी त्यांच्या सत्यदीपिका या नियतकालिकात या प्रक्रियेचे वर्णन क्रांती असे केले होते.
या समाजाने 28 तत्त्वांचा स्वीकार केला होता. यामध्ये मद्यपान वर्ज्य करण्यापासून तर शिक्षणाचा प्रसार करण्याची हमी देण्यापर्यंतच्या नानाविध तत्त्वांचा समावेश होता. या समाजाच्या ध्येयधोरणांनी प्रभावित होऊन कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण झाली. त्यांनी हा विचार मुंबईपासून विदर्भापर्यंत पोहचविला. या समाजाच्या विरोधात पुण्यातील ब्रह्मवृंद संपूर्ण ताकदीनिशी एकवटला होता. प्रमुख बुद्धिजीवींनी या समाजाला साथ दिली नाही, अशी तक्रार धनंजय कीर यांनी फुल्यांच्या चरित्रात केली आहे.
सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट होते. समाजाच्या एका अहवालात ते असे मांडले गेले : ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादिक लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख 24 माहे सप्टेंबर सन 1873 इसवी रोजी स्थापन केला. शूद्र बांधवांची मानसिक दास्यत्वाच्या कैदखान्यातून ... मुक्तता हे ध्येय सत्यशोधक समाजाचे होते. मानसिक दास्यत्वातून मुक्तीला अॅण्टोनिओ ग्राम्शीसारख्या मार्क्सवादी विचारकाला क्रांतीची पूर्वशर्त वाटते. ग्राम्शी यांच्या भाषेत सत्यशोधक समाजाचे हे कार्य म्हणजे प्रभुत्वाचा निरास करणारी क्रांती होती.
सत्यशोधक समाजाने सेवाभावी कार्य केले नाही किंवा समाजाच्या कुठल्यातरी अंगात सुधारणा सुचविली नाही. या समाजाने सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न हाताळला. हा प्रश्न भारतीय समाजाच्या पुनर्रचनेचा होता. समाजाने हाताळलेले विविध प्रश्न हे या पुनर्रचनेच्या संदर्भात होते. कुटुंबसुधारणा आणि सापेक्षत: अधिक समताधिष्ठित पर्यायी विवाह विधीचा विचार हा पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेच्या आणि पुरुषसत्ताक समाजाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून हाताळला गेला. धार्मिक विधींच्या पुनर्विचारापासून तर पहिली कामगार संघटना स्थापण्यापर्यंत अशा जीवनाच्या सर्वच पैलूंचा विचार सत्यशोधकांनी केला. अगदी संघटनात्मक लोकशाहीचीदेखील समाजाने काळजी घेतली. समाजाच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी फुल्यांनी समाजाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. विश्राम रामजी घोले यांच्याकडे सुपूर्द केली.
शिक्षणप्रसार हे समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. समाजाच्या 1875-मधील 22 ठरावांपैकी 18 ठराव हे शिक्षणासंबंधी होते. अगदी पुण्यातील रस्त्यांवरील मुलांना शाळेत नेण्यापासून तर रात्रशाळा चालविण्यापर्यंतचे उपक्रम या समाजाने चालाविले. शूद्रांमध्ये ज्ञानप्रसार होऊ नये यासाठी पुणे परिसरातील वरच्या जातींनी हिकमतीने योजना आखल्या. टिळकांपासून तर रानड्यांपर्यंत सर्वच अभिजनांनी यात भागीदारी केली. पण सत्यशोधकांनी हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला. आजचा शैक्षणिक विकास हा अंशत: या चळवळीचा परिपाक आहे.
सत्यशोधक समाज म्हणजे पुणे परिसरातील चळवळ होती, असा काहींचा समज आहे. पण तसे नाही. अलीकडे, जी. ए. उगले यांनी महाराष्ट्रभर विखुरलेल्या 596 प्रमुख सत्यशोधक कार्यकर्ते, लेखक, संपादक यांच्या विषयीच्या सखोल माहितीचे संकलन प्रसिद्ध केलंय; तसेच मुकुंदराव पाटील यांच्या अग्रलेखांच्या 5,000 हून अधिक पानांचे दहा खंड नुकतेच प्रसिद्ध झालेत. सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्यांची व्याप्ती आणि खोली यातून कळावी. सत्यशोधक विचारांच्या प्रभावात महाराष्ट्रात किमान एक हजार महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली गेली. महाराष्ट्रातील शेतकरी, स्त्री, जातीविरोधी, शिक्षण, कामगार चळवळी ह्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सत्यशोधक समाजाच्या उपज राहिलेल्या आहेत.
जोतिराव फुल्यांना साम्राज्यवादातील अंतर्विरोध समजला नव्हता, असा आरोप गो. पु. देशपाड्यांनी केलेला आहे. सत्यशोधक समाजाने एकाचवेळी जात्यंताची आणि समाजवादी क्रांती करावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे होते. जात्यंताशिवाय भारत हा वर्गसमाज होणार नाही आणि वर्गीय शोषणाचा प्रश्न हा जातीय शोषणाच्या अंताशिवाय सोडविता येणार नाही, यांचे सुयोग्य भान फुल्यांना होते. आधुनिक वासाहतिक भांडवली सत्तेने निर्माण केलेल्या अवकाशात फुले जुन्या सामंती व्यवस्थेच्या निरासाची तयारी करीत होते. तरी, ब्रिटिश सत्तेकृत वासाहतिक शोषणाची नोंद घेण्याचे फुल्यांनी टाळले नाही; तसेच साम्राज्यवाद आणि वर्णभेदाविरोधी उभ्या राहिलेल्या अमेरिकेतील काळ्यांशी नाते सांगायचेदेखील टाळले नाही. सत्यशोधक समाजाच्या मुकुंदराव पाटील यांनी राजकीय दातृत्वातून आपल्या चाबकाचा पीळ सैल होईल म्हणून दीनमित्रला देण्यात येऊ पाहिलेले राजकीय दातृत्व नाकारले होते.
पुढे चालून मात्र सत्यशोधकांचे हे वर्गभान सुटत गेले. समाजातील वाढत्या वर्गविरोधाची नोंद घेण्याऐवजी वर्गसमन्वयाचा विचार पारंपरिक सत्यशोधक चळवळीवर प्रभावी राहिला. रॉयवादी यशवंतराव चव्हाणांनी फुलेवादाची साथ सोडून नेहरूप्रणित कॉँग्रेसचा वर्गसमन्वयवाद स्वीकारला. सत्यशोधक समाजाचे अस्तित्व वार्षिक अधिवेशनापलीकडे राहिले नाही. नंतर तर सत्यशोधक समाजाच्या वारसांना बहुजन समाजातील साखरसम्राट, शिक्षणसम्राट हे शत्रू वाटेनासे झाले. शरद पाटील यांनी सत्यशोधक समाजाच्या विचाराशी भांडवलशाहीला आव्हान देणार्या मार्क्सवादी विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक सत्यशोधक आणि पारंपरिक डावे या सत्यशोधक मार्क्सवादी प्रयत्नापासून प्रयत्नपूर्वक लांब राहिले. सत्यशोधकांनी डावेपण आणि डाव्यांनी सत्यशोधकी बाणा नाकारल्यामुळे परिवर्ततनाचे चाक निम्यावरच रुतले. सत्यशोधक समाजाच्या या दीडशेव्या वर्षात ही गतिरुद्धता भेदली जाण्याचा विचार व्हावा.
निरक्षरता, स्त्रीप्रश्न, जातिव्यवस्थेचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न हे सत्यशोधकांचे आस्थेचे विषय होते. आज, याबाबत आपण किती मजल गाठली, हे तपासायला हवे. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 हा टिळकांचा वारसा आहे, असे अलीकडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. शरद कुंटे यांनी लिहिले आहे. जर ते तसे असेल तर हे धोरण निसर्गत:च सत्यशोधकांच्या भूमिकेला छेद देणारे ठरणार! स्त्रीविकासाबाबत भारत जगत तळाशी आहे, हे विविध पाहण्यांवरून सिद्ध होते. द ग्लोबल जेंडर पॅरिटी गॅप इंडेक्स, 2022 नुसार भारताचे स्थान 146 देशांमध्ये 135 वे आहे. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी देशोधडीस लागला आहे. तर जातीय अस्मिता टोकदार बनून भारताचे सामाजिक स्वास्थ्य पुरते बिघडले आहे. स्वातंत्र्याच्या 75-च्या आणि सत्यशोधक समाजाच्या 150 व्या वर्षात आपली ही उपलब्धी आहे. सत्यशोधक समाजाचा वारसा नव्या रूपात प्रज्वलित करूनच या अरिष्टवर मात करता येऊ शकते.
--------------
(परिवर्तनाचा वाटसरू या नियतकालिकासाठी लिहिलेल्या संपादकीयाचे विस्तारित रूप)
- लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे इंग्रजीचे प्राध्यापक असून राजकीय भाषाविज्ञान, जातवर्गलिंगभाव व सामाजिक चळवळी हे त्यांचे अभ्यासक्षेत्र आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon